Ad will apear here
Next
उपशास्त्रीय संगीत : ठुमरी

भारतीय संगीतात धृपद-धमार गायकी, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत अशा निरनिराळ्या गटांत विभागले गेलेले अनेक गीतप्रकार प्रचलित आहेत. यापैकी शास्त्रीय संगीत (क्लासिकल) म्हणजेच विलंबित ख्याल -द्रुत ख्याल (बडा ख्याल - छोटा ख्याल) यांबद्दल आपण जाणून घेतलं. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत उपशास्त्रीय संगीताबद्दल...
..........................
ठुमरी, होरी, कजरी, चैती, दादरा, झूला अशी गीतप्रकारांची नावं आपण ऐकली असतील. या सर्व गीतप्रकारांना उपशास्त्रीय संगीत (सेमी क्लासिकल म्युझिक) म्हणतात. म्हणजे शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत (लाइट म्युझिक) यांच्यामधला हा प्रकार. शास्त्रीय संगीतातील राग-शास्त्र यांचा पाया हवाच; पण सादरीकरण प्रकृती सुगम संगीताची असावी. सुरांचा, रागांचा आधार तर आहेच; पण शब्दप्रधानता महत्त्वाची. शब्दातून प्रकट होणारे भाव महत्त्वाचे. वेगवेगळ्या स्वराकृतींमधून शब्द सजवताना, त्यातील भाव रसिकांपर्यंत कसे पोहोचतील हे महत्त्वाचं.

'कां करूं सजनी आये ना बालम' किंवा 'कदर प्यारे लागे तुमसे नैन' किंवा 'सावन की ऋत आई रे सजनियां, प्रीतम घर नही आये' अशी कोणतीही भावना परिणामकारकरीत्या व्यक्त करायची, तर त्याला उपशास्त्रीय संगीताशिवाय पर्याय नाही. शास्त्रीय संगीतातील ख्यालाच्या बंदिशीमध्येही अशी शब्दरचना येते; पण बंदिशीची स्थाई म्हटल्यावर रागाचं स्वरशिल्प घडवण्यात कलाकार रमतो, पुढे शब्दांचा आधार फारच कमी लागतो. उपशास्त्रीय संगीतातील सर्व गीतप्रकारांमध्ये शब्दांतून व्यक्त होणारी भावना, सुरांच्या साहाय्यानं अधिकाधिक परिणामकारक करण्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. 

या उपशास्त्रीय गीतप्रकारांमध्ये, सर्वांत पहिली येते ती ‘ठुमरी’. काहीशी संथ लयीत, बोलबनावाच्या अंगानं खुलत जाणारी, विशिष्ट तालांमध्ये गायली जाणारी, भावपूर्ण रीतीनं गायली जाणारी ती ठुमरी. ठुमकत ठुमकत नर्तन करणारी नर्तिकाच जणू. ठुमरीचा संबंध उत्तर प्रदेशातील कथक नृत्यप्रकाराशी जास्त आहे. कथक नृत्याच्या सादरीकरणात ठुमरीतील अभिनय हा भाग खूपच लोकप्रिय. त्यामुळे ठुमरी गायनाची शैली ही नृत्याच्या अधिक जवळ जाणारी आहे. असंही म्हणता येईल की, ‘नृत्यातून भाव व्यक्त करायला मदत करणारी गीतरचना म्हणजे ठुमरी.’ साहजिकच आकारातील आलाप न घेता, गीताचे शब्द गुंफून घेतलेले बोलआलाप यात जास्त गायले जातात. तसेच जोरकस ताना, ठुमरी गाताना टाळल्या जातात.

सोळाव्या-सतराव्या शतकापासून ठुमरी गायली जाऊ लागली. त्याचा उगम काहीसा लोकसंगीतातून झाला असंही मानलं जातं. ठुमरी ही शृंगाररसप्रधान असते. ठुमरीमधून प्रेमभावना, प्रेमातील विरह-व्यथा, नात्यातील दुरावा असे विषय मांडले जातात. कधी कधी तर तिला आध्यात्मिक डूबही दिली जाते. ‘बाबूल मोरा नैहर छूटोही जाय’ या ठुमरीत नायिका हा आत्मा आणि प्रियकर हा परमात्मा अशा अर्थानं काव्यरचना केलेली दिसून येते. सिनेसंगीतातही या शैलीची छटा असलेली गीतं दिसून येतात. सर्वसाधारणपणे अवधी, भोजपुरी अशा उत्तर प्रदेशातील हिंदीच्या बोलीभाषांमधून ठुमऱ्यांची शब्दरचना अधिक दिसून येते. नेहमीच्या भाषेपेक्षा पनिया, रतिया, बतिया, सैंया, सजनवा, पिया, पिहरवा असे लडिवाळ शब्द यांत वापरले जातात.

ज्या रागांमध्ये ख्याल गायले जातात, त्या रागांमध्ये सहसा ठुमरी गायली जात नाही. यासाठी रागही हलकेफुलके वापरले जातात. विशेषत: देस, खमाज, तिलंग, तिलक कामोद, काफी, भैरवी, पहाडी, मांड, पिलू अशा रागांमधून ठुमऱ्या गायल्या जातात. यमन, बिहाग, सोहनी, सारंग अशा ख्यालांच्या रागांमध्येही काही ठुमऱ्या आहेत. ख्यालगायकीप्रमाणे रागाचे नियम पाळण्याचं बंधन ठुमरी गायनात नसतं. गीतातील भाव परिणामकारकरीत्या व्यक्त करण्यासाठी जवळपासच्या समप्रकृतिक रागात संचार करून पुन्हा मूळ रागात परतण्याचं स्वातंत्र्य कलाकाराला घेता येतं. म्हणूनच मिश्र काफी ठुमरी, मिश्र खमाज ठुमरी असा रागांचा उल्लेख केला जातो.

ठुमरी क्वीन गिरीजा देवीआवाजाचा विशिष्ट लगाव, त्यातील लहान-मोठेपणा (व्हॉल्युम), हरकती, खटके, मींड, तसंच हाय, हां, रामा, हाय राम असे शब्द या गोष्टी ठुमरी सादरीकरणातील सौंदर्य वाढवतात. काही खास निराळे ताल ठुमरीसाठी वापरतात. दीपचंदी (१४ मात्रा), अध्धा, पंजाबी (१६ मात्रा) या तालांमध्ये ठुमरी गायली जाते. ठुमरी साधारणपणे मध्य लयीत गायली जाते. 

ठुमरी ही एक सादरीकरणाची शैली आहे, असं मानलं, तर या शैलीचं वेगळेपण जपत, कजरी, होरी, दादरा यांसारखे इतर उपशास्त्रीय गीतप्रकार सादर केले जातात. ठुमरीपेक्षा दादरा जरा द्रुत लयीत जातो. दादरा या नावावरून तो सहा मात्रांच्या दादरा तालात असल्याचं जरी सूचित होत असलं, तरी तो आठ मात्रांच्या केरवामध्येही गायला जातो. याच शैलीमध्ये होळीचं-रंगपंचमीचं वर्णन करणारी 'होरी', चैत्रातील ऋतुबदलाचं, चैत्रपालवीचं वर्णन करणारी 'चैती', श्रावणातल्या काळ्या मेघांकडे पाहून पियाची याद येण्याचं वर्णन करणारी 'कजरी', झुल्यावर झुलत गायलेला 'झूला' हे सगळे याच पठडीतील गीतप्रकार. त्यांचा बाज, शैली एकसारखीच. ठुमरीला ख्यालाप्रमाणे स्थाई व अंतरा हे दोन भाग असतात, तर या गीतप्रकारांमध्ये अनेक अंतरे असतात. 

या उपशास्त्रीय गीतप्रकारांना तबला साथही खास शैलीची असते, असावी लागते. तालांच्या नेहमीच्या ठेक्याबरोबरच, 'लग्गी'चा उपयोग बहार आणतो. अंतरा झाल्यावर पुन्हा ध्रुवपदाला आल्यानंतर जी लग्गी वाजवली जाते आणि त्यानुसार गायक जो बोलबनाव करून रंग भरतो, ते या उपशास्त्रीय गीतप्रकाराचं वैशिष्ट्य मानलं जातं. सर्वसामान्य रसिकालाही डोलायला लावणारं हे या प्रकाराचं रूप मोठं लोभस, मनमोहक असतं. त्यामुळे रसिकांना हे उपशास्त्रीय गीतप्रकार खूपच भावतात.

हा उपशास्त्रीय बाज वाद्य वादनामध्येही रंगत आणतो. तिथे शब्द नसले, तरी त्या शैलीतील वादन श्रोत्यांना आवडतं. म्हणूनच सतार, संतूर, व्हायोलीन, सरोद या वाद्यांच्या वादनातही हा उपशास्त्रीय बाज बहार आणतो. उपशास्त्रीय गायनासाठी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अमीर खाँ, गिरीजादेवी, बेगम अख्तर, शोभा गूर्टू या कलाकारांची नावं आजही श्रोत्यांना आठवतात.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZHNBW
 अतिशय छान आणी सुलभ माहिती.. शास्त्रीय संगीताची गोडी असण्याराना उपयुक्त..
Similar Posts
संगीत : विद्या की कला? लोकप्रिय संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ यातील कविराज ‘बांके बिहारी’ या पात्राच्या तोंडी लेखकानं मोठी मार्मिक विधानं घातली आहेत. तो म्हणतो, ‘बाहेरून आत येते ती विद्या आणि आतून बाहेर येते ती कला.’ ताल शिकवता येतो, पण लय वरून येतानाच घेऊन यावी लागते, ती शिकवता येत नाही. मला वाटतं विद्या आणि कला यांतील हाच फरक लक्षात घेतला पाहिजे
बंदीश : तालबद्ध रचना आम्हांला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही, असं म्हणणाऱ्या रसिकांना, संगीतातील निरनिराळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. अशा विषयांची रसिकांना अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्याचं काम या सदरातून केलं जात आहे. गायक कलाकार एखाद्या रागातून आपल्या बुद्धिकौशल्यानं श्रोत्यांसमोर सौंदर्यपूर्ण स्वरमहाल उभा करतात
संगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक संगीत शिकत असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही अनेकदा संगीताबद्दल काही मूलभूत प्रश्न सतत पडतात. या ‘एफएक्यू’ची (फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स) उत्तरं वेळीच आणि योग्य मिळाली पाहिजेत. अन्यथा संगीतातल्या निखळ आनंदाला मुकावे लागू शकते... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत संगीतातील ‘एफएक्यू’बद्दल
संगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग दोन संगीतातील ‘एफएक्यू’जपैकी (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स) काही प्रश्नांची उत्तरं मागील भागात आपण पाहिली. त्यात प्रामुख्यानं एक गोष्ट लक्षात आली असेलच, की गाण्यासाठी संगीताची किमान प्राथमिक माहिती असावी लागते. स्वरांचं ज्ञान असावं लागतं आणि गळ्यातून सुरेल स्वर निघण्यासाठी काही काळ जावा लागतो... ‘सूररंगी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language